दिल्ली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भारतीय जनता पार्टीला पाठिंबा
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून जेपी नड्डा यांना पत्र, खासदार प्रचारात उतरले
पालकमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा राज्यामध्ये सुरू असतानाच दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे नाराज असल्याची चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
.jpeg)
यासंबंधीचे एक पत्र भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पाठवण्यात आले आहे. या पत्रात भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतील सर्व उमेदवारांना शिवसेना पक्ष पाठिंबा देत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षविरुद्ध आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात लढत होत आहे. यात इंडिया आघाडीतील अनेक घटक पक्षांनी आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे युतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने मात्र भारतीय जनता पक्षाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या संदर्भात काँग्रेसने आम आदमी पक्षावर देशद्रोही असल्याचा आरोप केला होता. या काँग्रेसच्या आरोपाशी आम्ही सहमत नसल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते.
Dhages

युतीत पालकमंत्री पदावरून वाद
राज्य विधानसभा निवडणुकीच्या नंतर सत्ता स्थापनेमध्ये एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यामुळेच मंत्रिमंडळाची शपथविधी आणि खाते वाटप होण्यास देखील उशीर झाला. त्यातच पालकमंत्री पदाच्या नावांची घोषणा होण्यास देखील बराच कालावधी लोटला. मात्र त्यानंतर देखील महायुतीमधील वाद कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारला नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाच्या नावाची घोषणा केल्यानंतर देखील स्थगिती द्यावी लागली. यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असून ते त्यांच्या मूळ गावी निघून गेले असल्याचे समोर आले आहे. त्यातच आता शिवसेनेच्या वतीने भाजपला दिल्ली विधानसभेत पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मात्र उमेदवार उभे केले?
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने बुरारी, बदली, मंगोलपुरी, चांदनी चौक, बल्ली मारन, छतरपूर, संगम विहार, ओखला, लक्ष्मी नगर, सीमा पुरी आणि गोकुळ पुरी या मतदारसंघांमध्ये उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच उमेदवारांची घोषणा देखील केली आहे. पक्षश्रेष्ठी आणि खासदारांच्या मतांनी या उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे.
