बुरखा घालून 10 वी-12 वीच्या परीक्षा देण्याची परवानगी देऊ नका
मंत्री नितेश राणे यांचे शिक्षण मंत्र्यांकडे मागणी; राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता
सातत्याने हिंदुत्वावर आक्रमक भूमिका घेणारे नितेश राणे यांनी एकदा मुस्लिम विद्यार्थ्यांसंदर्भात राज्य सरकारकडे मागणी केली आहे. इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी नाकारण्यात यावी, अशी मागणी राणे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.
त्यासंबंधी त्यांनी आपले अधिकृत पत्र दादा भुसे यांना दिले आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकरणावर राज्यात पुन्हा एकदा वादंग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
.jpeg)
यासंबंधी दादा भुसे यांना दिलेल्या पत्रात नितेश राणे यांनी म्हटले आहे की, दहावी आणि बारावीच्या परीक्षा या पारदर्शकपणे होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे बुरखा घालून इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा उपयोग करून परीक्षा देत आहे की नाही, हे तपासणे शक्य होत नाही. त्यामुळे अशावेळी बुरखा घालून परीक्षा देण्यात बंदी घालण्यात यावी. तसेच आवश्यकता भासल्यास तपासणीसाठी महिला पोलिस अधिकारी किंवा शिक्षक कर्मचारी यांचे नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी देखील राणे यांनी केली आहे.
Dhages

मंत्री नितेश राणे यांनी लिहिलेले पत्र देखील वाचा....
महादेय,
इयत्ता १० व १२ वी च्या परीक्षेस परीक्षार्थीना बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी, तसेच परीक्षेच्या वेळी आवश्यकता वाटल्यास प्रकरणपरत्वे तपासणीसाठी महिला पोलीस /अधिकारी किंवा शिक्षक कर्मचारी यांची नेमणूक करण्यात यावी, असे शासन स्तरावरुन कळविण्यात आले आहे.
इयत्ता १० व १२ वी परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या परीक्षा आहे. यावर विद्यार्थ्यांचे संपूर्ण भविष्य अवलंबून आहे. सदर परीक्षा पारदर्शकपणे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार जसे कॉपी मुक्त परीक्षा होणे अपेक्षित आहे. याकरीता शासनस्तरावरुन वेळोवेळी सुचना दिल्या जातात. जर, परीक्षार्थीना बुरखा घालून परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आला तर, एखादी परीक्षार्थी बुरखा घालून ईलेक्ट्रॉनीक उपकराणाचा उपयोग करुन परीक्षा देत आहे किंवा नाही, हे तपासणे शक्य होत नाही. आकस्मिक प्रसंगी काही आक्षेप उदभवल्यास सामाजिक तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनेक विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावे लागेल.
सबब, राज्यातील इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी च्या परीक्षार्थीना बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्याकरीता तातडीने कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत, ही विनंती.