लातूर शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी एकजुटीने काम करू - ना. शिवेंद्रराजे भोसले यांची ग्वाही
पालकमंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर पहिल्याच शासकीय कार्यक्रमात हजेरी, विकासकामांबाबत केले आश्वस्त
लातूर/प्रतिनिधी : 26 जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतीय संविधान स्विकारण्यात आले. या दिवसापासून भारतीय लोकशाहीच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली. कायद्याचे राज्य लागू झाले. त्यामुळे सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. आज महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सिंगच्या या कॉलेजच्या इमारतीचे भूमिपूजन झाले.
लातूरचा पालकमंत्री म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर जबाबदारी सोपविलेली आहे. त्यामुळे शहरातील पाणी प्रश्न,कचरा यासह सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे काम करून लातूर शहराच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टिने जे जे चांगले करता येईल ते करून लातूर शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी एकजुटीने काम करू असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना.शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
.jpeg)
यावेळी ते जेएसपीएम संचालित महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सिंगच्या या महाविद्यालयाच्या भव्य इमारत भूमिपूजन समारोह सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी जेएसपीएम कॅम्पस पी-74, एमआयडीसी, कळंब रोड,लातूर येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील, जेएसपीएमचे उपाध्यक्ष तथा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष काळे, जेएसपीएमचे कार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर, जेएसपीएमचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष,प्राचार्य मारुती सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
लातूर आता महायुतीचा बालेकिल्ला बनलाय
पुढे बोलताना पालकमंत्री छत्रपती भोसले म्हणाले की, लातूर जिल्ह्यामध्ये सहा पैकी पाच आमदार महायुतीचे आहेत. त्यामुळे लातूर भाजपाचा बालेकिल्ला म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. आपल्या कालावधीतमध्ये शासकीय दवाखान्याचा प्रश्न मार्गी लावू. याबरोबरच पाण्याचाही विषय महत्त्वाचा आहे. पाणी प्रश्नाबाबत सगळीकडे वादाचा विषय होतो. त्यामुळे यावर आता काही बोलणार नाही. परंतु याबाबत माहिती घेऊन त्याबाबतही काही करता येईल का ते आपण येणार्या काळात पाहू. असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सिंग भव्य इमारत भूमिपूजन कोनशीलेचे अनावरण लातूरचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी लातूरचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह प्रमुख मान्यवरांचा सन्मान छत्रपतीची मूर्ती, सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.
तसेच इस्कॉनचे धडे देणार्या संचिता गायकवाड व वैष्णवी शिंदे यांचाही लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. तसेच जेएसपीएम संचालित शिवाजी महाविद्यालय रेणापूरचे प्राचार्य डॉ.आर.एस.अवस्थी उत्कृष्ठ प्राचार्य, महाविद्यालयाला उत्कृष्ठ महाविद्यालय व स्वामी विवेकानंद एमआयडीसी लातूर या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र.02 मध्ये लातूर तालुक्यातून दुसरा क्रमांक आणि 2 लक्ष रूपयांचे पारितोषिक जाहीर झाल्याबद्दल जेएसपीएम संस्थेच्यावतीने प्राचार्य गोविंद शिंदे व मारुती सूर्यवंशी यांचा व शिवाजी विद्यालय बिटरगावला टप्पा क्र.2 मधून तिसरा क्रमांक मिळाल्याबदल मुख्याध्यापक सूर्यकांत चव्हाण यांना स्मृतीचिन्ह व गुलाब पुष्प देऊन पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जेएसपीएमचेे उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार अब्दूल गालिब शेख यांनी मानले. यावेळी या कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी, जेएसपीएम संस्थेचे पदाधिकारी, जननायक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Dhages

कव्हेकर साहेबांच्या अनुभवाची मदत घेऊन विकासाला गती देऊ - छत्रपती शिवेंद्रराजे भोसले
मी आज छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे घेऊन काम करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह लातूर जिल्हा वासियांच्या माझ्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.त्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करू. भाजपा नेते तथा माजी आ.कव्हेकर साहेबांनी माझे वडील तत्कालीन मंत्री अभयसिंहराजे भोसले यांच्यासोबत काम केलेले आहे. त्यामुळे तुम्ही वडिलांसमान आहात. तो आदर माझ्याही मनी कायम राहणार. त्यामुळे या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये अधिकारांने माझ्याकडून कामे करून घ्या. पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मराठवाडा छत्रपतीवर जास्त प्रेम करतो. त्यामुळे हे लातूरकरांसह कव्हेकर परिवारांचे प्रेम कायम राहू द्या. आपल्या अनुभवाची मदत घेऊन विकासाला गती देऊ, असा विश्वास लातूरचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
मोदीजींच्या नेतृत्वात भारत महासत्ता बनून जगाचे नेतृत्व करेल - माजी आ. कव्हेकर
आज माजी मंत्री अभयसिंह राजे भोसले यांचे चिरंजीव शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे आगमन लातूर शहरात झाल्यामुळे सगळीकडे नवचैतन्य निर्माण झाले आहे. भोसले परिवाराचे आणि कव्हेकर परिवाराचे ऋणानुबंध कायम आहेत. मी युवक काँग्रेसचा प्रदेश उपाध्यक्ष होतो. त्यावेळी तत्कालीन मंत्री अभयसिंह राजे भोसले हे काहीवेळा लातूरला आले होते. ते ऋणानुबंध कायम ठेवण्याचे काम त्यांचे चिरंजीव छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून होत आहे. आज रोबोटक एआयच्या माध्यमातून देशामध्ये एक वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भविष्यामध्ये मानवाला काम कमी राहील. सर्वात हुशार तरूण हे भारतात आहे व बेकाराची संख्याही भारताताच आहेत. परंतु निधर्मीपणाच्या नावाखाली गेल्या पासष्ट ते सत्तर वर्षापासून कारकुणी शिक्षण देण्याचे काम केलेले आहे. परंतु देशामध्ये नरेंद्र मोदी व राज्यामध्ये फडणवीस यांनी चांगल्या प्रकारे काम करून सीबीसीएस शिक्षणातून देशाला व राज्याला प्रगतीपथावर नेण्याचे काम केलेले आहे. मोदींच्या योगदानामुळे भारत जगात पाचव्या क्रमांकावर आहे. तो भविष्यात तिसर्या क्रमांकावर येईल व 2047 मध्ये अमेरिका व चीनलाही मागे टाकून मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत महासत्ता बनून जगाचे नेतृत्व करेल. मा.मोदी साहेब व मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर होऊन देशात महाराष्ट्र एक नंबर होईल, असा विश्वास माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
विभागीय क्रीडा सकुंलामुळे मराठवाड्यातील खेळाडूंना न्याय मिळेल - अजित पाटील कव्हेकर
लातूर तालुक्यातील कव्हा गावामध्ये मराठवाड्यातील खेळांडूसाठी विभागीय क्रीडा संकुल मंजूर झाले. यासाठी कव्हा गावातील 22 एकर जमीन क्रीडा संकुलासाठी देण्याचे काम भाजपा नेते तथा किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले. या क्रीडा संकुलाच्या कंम्पाऊंड वॉलचे काम पूर्ण झालेले आहे. परंतु स्थानिक राजकारणामुळे विभागीय क्रीडा संकुलासाठी अडचण येत आहे. त्यामुळे लातूरचे पालकमंत्री ना.शिवेंद्रराजे भोसले यांनी यामध्ये लक्ष दिले तर काम गतीने होईल आणि मराठवाड्यातील खेळाडूंना न्याय मिळेल. याबरोबरच लातूर शहरातील जिल्हा रूग्णालयाचा प्रश्न मार्गी लावून लातूरसाठी महत्त्वाचे असणार्या मराठवाडा वॉटरग्रिड योजनेलाही गती द्यावी. अशी अपेक्षाही भाजपा युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
