बदलत्या वातावरणाचा आरोग्य आणि पिकांवर होतोय विपरीत परिणाम!
वंदना वेदपाठक : नोव्हेंबर महिन्यात सुरू झालेली थंडी गेल्या आठवड्याभरापासून गायब झाली आहे. समुद्रात सुरू असलेल्या चक्रीवादळामुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. नोव्हेंबर मध्ये पडलेली कडाक्याची थंडी आणि त्यानंतर झालेल्या दमट, ढगाळ वातावरणामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
या बदललेल्या वातावरणाचा फटका शेतकऱ्यांनाही बसत आहे. अनेक पिकांवर बुरशीजन्य रोग पडण्यास सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून उष्मा आणि ढगाळ वातावरण असल्याने आरोग्याच्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे.
खासगी व सार्वजनिक रुगालयांमध्ये ताप, अंगदुखी,सर्दी, खोकला तसेच पोटदुखी या स्वरूपाच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते आहे.
.jpeg)
घाम तसेच उष्मा वाढल्यामुळे त्वचारोगाच्या सुद्धा तक्रारी वाढल्याचे दिसून येते. सध्या दिवसभर उष्ण आणि संध्याकाळी, रात्री पुन्हा हवेमध्ये गारवा जाणवतो. त्याचाही दुष्परिणाम आरोग्यावर होतो. या प्रकारचे वातावरण हे विषाणू संसर्गासाठी पूरक असते.
अशा प्रकारच्या वातावरण बदलामुळे सर्दी, ताप, खोकला या प्रकारच्या साथींचे आजार वाढतात. त्यामुळे या आजारावर वैद्यकीय, उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होते. खोकला, घसा दुखणे, पित्त होण्यासह अंगावर पुरळ होण्याच्या तक्रारी वाढत असल्याचे संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ यांनी सांगितले.
खोकल्याचा त्रास दीर्घकाळ राहत असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. कोणत्याही प्रकारचा ताप दोन दिवसांपेक्षा अधिक काळ राहिला तर अंगावर काढू नका, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच मुलांना श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होत असेल, तीव्र सर्दी-खोकला असल्यास किंवा घरातील अन्य कोणी आजारी असल्यास आजाराची तीव्रता वाढू शकते.
पिकांवर होणारा परिणाम
पिकांवर विविध प्रकारचे बुरशीजन्य आजार दिसून येत आहेत.ढगाळ वातावरणामुळे पिकांवर विपरित परिणाम होत आहे. पिके सध्याच्या वातावरणाला बळी पडू नयेत, यासाठी शेतकऱ्यांना वारंवार औषधी फवारण्यांचा मार्ग निवडावा लागतो आहे.
